जगात पैसा मिळविण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाताना दिसतात. अनेकवेळा लोक पैशाच्या लालसेपोटी जीवाचीही परवा करत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. सध्या जगभरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. अशात अनेक संस्थांनी लोकांना कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता लोकांवर बळजबरीने लस घेण्याची वेळ आली आहे. कारण अनेक लोकांना अजूनही कोरोना लस घातक आहे असे वाटते. यामुळे ते लस घेण्यास कचरतात. मात्र, आता ती सक्तीची झाल्याने लोकांवर मजबुरीने लस घेण्याची वेळ आली आहे.
अशा 'असहाय' लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. हे लोक इतरांच्या नावाने नोंदणी करून कोरोनाची लस घेत आहेत. यासाठी ते संबंधित व्यक्तीकडून चार हजार रुपये घेत आहेत आणि त्या व्यक्तीला लस घेऊन लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवून देत आहेत. अशीच एक व्यक्ती इंडोनेशियात समोर आली आहे. ही व्यक्ती इतरांच्या नावाने लस घेऊन केवळ 4 हजार रुपयांत त्या वक्यक्तीला प्रमाणपत्र विकत असे.
माध्यमांतील वृत्तानुसार, इंडोनेशियातील या व्यक्तीचे नाव अब्दुल रहीम असे आहे. तो इंडोनेशियातील साउथ सुलावेसी येथील रहिवासी आहे. या व्यक्तीने आतापर्यंत एकूण 14 कोरोना लसी घेतल्या आहेत. यांपैकी 2 डोस त्याने स्वतःच्या नावाने घेतले आहेत, तर उर्वरित इतरांच्या नावावर घेतले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर हा व्यक्ती इतरांच्या नावाने लस घेत असे व नंतर त्याचे प्रमाणपत्र पाचशे ते चार हजारांना विकत असे.
उघडपणे तयार केला व्हिडिओ - रहिमने यासंदर्भात व्हिडिओ बनवून लोकांना ऑफर दिल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्याने उघडपणे व्हिडिओ तयार करत म्हटले आहे, की जर कुणाला इंजेक्शनशिवाय कोरोना प्रमाणपत्र हवे असेल, तर त्याच्याशी संपर्क साधावा. बघता बघता रहीमचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. आता हे प्रकरण स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचले असून देशाच्या संसर्गजन्य रोग कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे कृत्य करणारा रहिम एकटाच व्यक्ती नसल्याचेही समोर आले आहे. असे कारनामे करून प्रमाणपत्रे विकणारे अनेक जण इंडोनेशियामध्ये आहेत.