नाकातून द्यायची लस, आधीचे डोस घेतलेल्यांसाठी बूस्टर डोस, लहान मुलांसाठी स्वतंत्र लस- हे सगळे कोरोना लसीचे सेकंड जनरेशन अवतार आहेत. सध्या अवघे जग लसीच्या गंभीर तुटवड्याचा सामना करत असताना वेगवेगळ्या देशांनी आपापल्या स्तरावर लस संशोधनाला सुरुवात केली आहे. आता तब्बल ६० वेगवेगळ्या लसी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंदलेली आहे. शिवाय प्रीक्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर तब्बल १८४ संशोधने आहेत. अर्थात, लसींचा या पुढील प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. कारण संशोधनातील गुंतागुंत आणि प्रत्येक टप्प्यावर लागणारी महाप्रचंड गुंतवणूक! त्यामुळे पाइपलाइनमध्ये असलेले हे लस प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता फारच अंधुक असणार आहे, हे नक्की! जॉन्सन अँड जॉन्सन, रशियाची स्पुतनिक आणि भारताची कोव्हॅक्सिन या लसी आपत्कालीन परवान्यानुसार वापरात असल्या तरी या तिन्ही लसींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्सचे निष्कर्ष अजून आलेले नाहीत. अस्त्रा झेनेका, फायझर, मॉडर्ना या तीन आणि चीनच्या दोन, अशा पाचच लसींची चौथी ट्रायलही यशस्वी झालेली आहे.
Corona Vaccine: आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 5:17 AM