जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोना लसीबद्दल लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लसीबाबत नागरिकांच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने अनोखं पाऊल उचललं आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन राशिद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट हे शक्य तितक्या लोकांचं लसीकरण करणं हा आहे. "राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्या 3 ते 4 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. पाकिस्तानमध्ये 2 फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे" असंही म्हटलं आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही. तसेच ज्यांनी लसीसाठी नोंदणी देखील केली नाही. पहिल्या टप्प्यात त्यांना आधी इशारा देण्यात येईल. त्यानंतर अशा लोकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी आणि लस घेण्यासाठी वेळ निश्चित केली जाईल. पुढील टप्प्यात, उल्लंघन करणार्यांच्या ओळखपत्रांशी जोडलेली सिम कार्ड बंद केली जातील. लस घेतल्यानंतर सिमकार्ड पुन्हा सुरू केले जातील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
भारतात कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. असं असताना एका ठिकाणी पेट्रोल चक्क मोफत देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोरोना लस घेणाऱ्यास या मोफत पेट्रोलचा लाभ मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या चायबासा जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.