जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. सर्वच देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जगभरात कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
लोकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून एका देशाने अनोखी शक्कल लढवली आहे. "कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" असं म्हटलं आहे. हाँगकाँगने (Hongkong लसीकरणासाठी ही जबरदस्त ऑफर दिली आहे. लस घेणाऱ्या लोकांना हाँगकाँगने चक्क रोलेक्स वॉच (Rolex Watch), टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Car), सोन्याची बिस्किटं (Gold Bar) आणि 10 कोटींचा फ्लॅट (10 Crores Flat) बक्षीस म्हणून मिळवण्याची मोठी संधी दिली आहे. ही एक प्रकारची लॉटरी असून, लॉटरी प्रणालीद्वारे (Lottery System) विजेता घोषित केला जाणार आहे.
हाँगकाँगच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लोक कोरोना लस घ्यायला घाबरत होते. मात्र आता या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. यापूर्वी ज्यांना लस घेण्याची भीती वाटत होती, असे लोकही ही ऑफर येताच कोरोना लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 30 टक्के म्हणजे सुमारे 22.7 लाख लोकांचं लसीकरण झालं असून, ही ऑफर जाहीर केल्यानंतर गेल्या 10-15 दिवसांत लसीकरणाचा वेग चांगलाच वाढल्याचं देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
लसीकरणासाठी अशा प्रकारची ऑफर देणारा जगातला हा काही पहिला देश नाही. या आधी अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनीही लस घेण्यासाठी लोकांना आकर्षक ऑफर दिली होती. अमेरिकेने लोकांना विनामूल्य बिअर आणि फ्लाइट तिकिटांवर सूट देण्याची ऑफर दिली आहे. या ऑफर्समुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. फ्रान्स, रशिया आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये आयफोन आणि वर्ल्ड टूरच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. भारतातही कोरोना लस घेतल्यानंतर लोकांना काही भन्नाट ऑफर देण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.