मॉस्को - कोरोनाविरोधात प्रभावी ठरलेली रशियाची स्पुटनिक-व्ही ही लस भारतात दाखल झाली आहे. (Corona vaccine Update:) दरम्यान, स्पुटनिकपाठोपाठ आता रशियाने या लसीची नवी आवृत्ती समोर आणली आहे. स्पुटनिक लाइट असे या कोरोनावरील नव्या लसीचे नाव असून, ही लस कोरोनाविरोधात ८० टक्के प्रभावी असल्याच्या दावा करण्यात येत आहे. या लसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा एकच डोस कोरोनाला मात देण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (Russia brings Sputnik light after Sputnik-V, fights Corona in one dose)
ही लस विकसित करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्या रशियातील प्रत्यक्ष गुंतवणूक कोषाकडून सांगण्यात आले की, दोन मात्रा घ्याव्या लागणाऱ्या स्पुटनिक व्ही पेक्षा एका मात्रेत घ्यावी लागणारी स्पुटनिक लाईट ही लस अधिक प्रभावी आहे. स्पुटनिक व्ही ही लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. तर स्पुटनिक लाइट ही ७९.४ टक्के प्रभावी आहे.
५ डिसेंबर २०२० पासून १५ एप्रिल २०२१ पर्यंत रशियात चाललेल्या व्यापक लसीकरणा मोहिमेमध्ये ही लस देण्यात आली. त्यानंतर २८ दिवसांनी या लसीची माहिती घेण्यात आली होती. आतापर्यंत ६० देशांमध्ये रशियाच्या लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. मात्र युरोपियन मेडिसीन एजन्सी आणि युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने या लसीला अद्याप मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, काही पाश्चिमात्य देशांनी स्पुटनिक लसीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. सोव्हियत काळातील स्पुटनिक या उपग्रहाच्या नावावरून या लसीचे नामकरण करण्यात आले आहे. रशियाने व्यापक प्रमाणात वैद्यकीय चाचण्या न करताच ऑगस्टमध्ये या लसीची नोंदणी केली होती. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीचे नियतकालिक असलेल्ये द लेसेंटने ही लस सुरक्षित असून, तिच्या दोन मात्रा ह्या ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे म्हटले आहे.