नवी दिल्ली – भारतासह जगातील अनेक देश कोरोनामुळे चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं. भारतात मागील वर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेकजण मृत्युमुखी पडले. परंतु तिसऱ्या लाटेचा देशावर फारसा परिणाम दिसला नाही. कोरोना व्हायरस सुरुवातीपासून त्याच्या रुपात बदल करत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा,(Delta) ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटची दहशत लोकांच्या मनात बसली.
वैज्ञानिकांच्या मते, कुठलीही लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर परिणामकारक नसेल. त्यामुळे अनेक देशात कोरोना लसीचा(Corona Vaccine) बूस्टर डोस(Booster Dose) देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच आता यूनिवर्सल लस उत्पादन करण्याची चर्चा सुरु झाली आहे. यूनिवर्सल लस म्हणजे ही एक अशी लस असणार जी कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटशी लढण्यासाठी सक्षम असेल. नेचर पत्रिकेत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, व्हेरिएंट प्रूफ लस बनवण्याची चर्चा सुरु आहे. बूस्टर डोसपासून मिळणारी शक्ती कालांतराने कमी होत जाते. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर संक्रमणाला रोखणारी अशी लस निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे.
‘अशी’ लस उत्पादन करणं शक्य
यूनिवर्सल लस बनवण्याची चर्चा नवीन नाही. मागील एक दशकापासून यूनिवर्सल फ्लू शॉट बनवण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न सुरु आहे. २०१९ मध्ये एका लसीची चाचणी सुरु झाली परंतु आतापर्यंत त्याला मार्केटमध्ये मंजुरी मिळाली नाही. फाउची आणि अन्य तज्ज्ञांच्या मते, कोविड व्हेरिएंट आणि भविष्यात कोरोनासाठी यूनिवर्सल लस लवकर येऊ शकत नाही. परंतु नव्या रिसर्चनुसार, अशी लस बनवणं शक्य आहे.
‘असं’ करणार लस काम
यूनिवर्सल लस व्हायरसच्या त्या भागांवर हल्ला करणार जिथं व्हेरिएंट बदलानंतरही परिणाम होत नाही. जर इम्युन सिस्टममधील त्या भागांना ओळखून सक्षम केले तर अशा प्रकारची लस बनवणं शक्य आहे. अमेरिकन सैन्याचं वॉल्टर रिड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च पॅन कोरोना व्हायरसच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी निकालाची प्रतिक्षा करत आहेत. त्याशिवाय DIOSyn नावाची कंपनीही अशाप्रकारची लस विकसित करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे कोरोनावर यूनिवर्सल लस लवकर तयार होण्याची अपेक्षा आहे.