मॉस्को - कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी रशियाने सर्वप्रथम स्पुतनिक-V नावाने लस बनवली होती. मात्र या लसीला विकसित करणारी कंपनी गेमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ अपिडोमिलोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीविरोधात चोरीचा आरोप झाला आहे. एका रिपोर्टनुसार यूकेमधील ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेका लसीची ब्ल्यूप्रिट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून स्पुतनिक-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात येत आहे.
द सन च्या वृत्तानुसार, संरक्षणविषयक सूत्रांनी मंत्र्यांना सांगितले की, त्यांच्याजवळ रशियाचे राष्ट्रपती कार्यालय असलेल्या क्रेमलिनमधील गुप्तहेरांनी ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला. त्यानंतर त्याचा वापार स्वत:ची लस विकसितकरण्यासाठी केला.
लसीची ब्ल्यूप्रिंट आणि इतर महत्त्वाची माहिती एका परकीय एजंटकडून वैयक्तिररीत्या चोरण्यात आली. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपण स्पुतनि-V लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी रशियन नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले होते. स्पुतनिक-V लसीला आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप मान्यता मिळालेली नाही.मात्र असे असले तरी ७० देशांनी तिच्या वापराला मान्यता दिली आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डप्रमाणेच स्पुतनित-V लससुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे. चाचणीच्या निकालांच्या आधारावर स्पुतनिक-V लसीचा एफिकेसी रेट ९१.६ टक्के आहे. तसेच या लसीचे कुठलेही साईड इफेक्ट अद्याप समोर आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर इतर लसींप्रमाणेच ताप, थकवा असे सर्वसाधारण साईड इफेक्ट दिसून येतात.
स्पुतनिक-V लसीचे दोन डोस घेतले जातात. ही लस कोविशिल्ड लसीप्रमाणेच व्हायरल व्हेक्टर प्लॅटफॉर्ममध्ये एडोनोव्हायरसचा वापर करून तयार करण्यात आली आहे. या लसीच्या दोन डोसमध्ये २१ दिवसांचे अंतर ठेवले जाते. तसेच ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये सहजपणे स्टोअर करता येते. स्पुतनिक-V लसीचा डोस १८ वर्षांवरील कुठल्याही व्यक्तीला दिला जाऊ शकतो. मात्र गर्भवती महिलांना या लसीचा डोस देण्याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. स्पुतनिक-V च्या चाचणीमध्ये मुले आणि गर्भवती महिलांचा समावेश केला गेला नव्हता.