जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागल आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी वेगाने लसीकरणा मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अरेजो यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती जेर बोल्सनारो यांच्याकडे सोपवला आहे. ब्राझीलसाठी जगभरातून आवश्यक त्याप्रमाणात कोरोना लस न मिळवणे हा एक कूटनितीक पराभव असल्याचं समजलं गेलं आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ब्राझीलसारखा देश लसीसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळेच इतर देशांसोबत असलेले संबंध वापरले जात आहेत. मात्र परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अरेझो अपयशी ठरले. त्यामुळेच ब्राझीलला आवश्यक त्या प्रमाणात लस मिळू शकली नाही.
ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी देखील अनेकदा सार्वजनिक मंचावरून परराष्ट्र मंत्र्यावर जोरदार टीका केली होती. एर्नेस्टो अरेजो यांनी अनेकदा चीनविरोधातही उघडपणे टीका केली. त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर झाला. त्याशिवाय अरेजो हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचे समर्थक समजले जातात. त्यामुळे अमेरिकेतूनही लस पुरवठा होत नाही. भारताने ब्राझीलमध्ये कोरोना लसीचा पुरवाठ केला आहे. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी लसीसाठी ट्विटरवरून भारताचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ
ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 24 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3 लाख 10 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत. त्यात देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. देशातील 26 पैकी 16 राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. 90 टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत. रिओ ग्रँड डो सुल येथे तर आयसीयू केअर युनिटमध्ये दाखल होण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत वेटिंग लिस्ट तब्बल दुपटीनं वाढली आहे. बेड्सच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना चक्क खुर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत.