लंडन: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील लाटेचा धोका कायम आहे. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. यानंतर आता कोरोना विरोधात शास्त्रज्ञांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता शास्त्रज्ञ बूस्टर डोसवर काम करत आहेत. कोरोना विरोधात आणखी एक लस; 'नोवाव्हॅक्स' लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!
कोणती कोरोना लस बूस्टर डोस म्हणून उत्तम काम करते यावर केंब्रिजमध्ये शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. लंडनमध्ये यासाठी राष्ट्रीय चाचणी सुरू आहे. ऍडनब्रूक रुग्णालयात सुरू असलेल्या चाचणीत १८० जणांनी सहभाग घेतला. या संशोधनाला कोव-बूस्ट असं नाव देण्यात आलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोसच्या तुलनेन तिसरा डोस कितपत अधिक संरक्षण देतो, याचा अभ्यास सध्या संशोधनांकडून सुरू आहे. कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय
ब्रिटनमध्ये सुरू असलेलं संशोधन सरकारच्या सहकार्यानं सुरू असून त्यासाठीचा संपूर्ण निधी सरकारनं पुरवला आहे. साऊदॅम्टन विद्यापीठानं यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्रिटनमधील १८ ठिकाणी चाचण्या घेतल्या जात आहेत. लसीच्या तिसऱ्या डोसचा रोगप्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो, ही क्षमता किती वाढते, याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. या प्रकारचं हे जगातलं पहिलंच संशोधन आहे.
जगात सध्या बहुतांश ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस दिले जात आहेत. हे दोन्ही डोस एकाच लसीचे असतात. मात्र ब्रिटनमध्ये सुरू असलेलं बूस्टर डोसवरील संशोधन काहीसं वेगळं आहे. एकाच लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसऱ्या कंपनीच्या लसीचा डोस दिला जात आहे. यासाठी सात लसींचा वापर केला जात आहे. त्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका, फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना, नोवावॅक्स, वेलनेवा, जॅन्सेन आणि क्युरेवॅक लसींचा समावेश आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १० ते १२ आठवड्यांनी बूस्टर डोस म्हणून या लसींचा डोस दिला जाईल. त्यानंतर व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती किती वाढते ते पाहिलं जाईल.