बीजिंग : आग्नेय चीनच्या फुजियान प्रांतात कुआनझोवू शहरात कोरोना व्हायरसच्या (कोविड-१९) झालेल्या उद्रेकामुळे अशा रुग्णांना सर्वांपासून वेगळे ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले हॉटेल शनिवारी कोसळून १० जण ठार झाले. सुमारे ७१ लोक हॉटेलच्या ढिगाºयाखाली अडकले आहेत. ढिगाºयाखालून ४३ जणांना बाहेर काढण्यात आले.
चीनमध्ये सेंट्रल हुबेई प्रांतात रविवारी या विषाणूने आणखी २७ जणांचा जीव घेतला. गेल्या महिनाभरात एका दिवसात सगळ्यात कमी रुग्ण मरण पावले आहेत. या २७ जणांच्या मृत्यूमुळे एकूण तीन हजार ९७ जण मरण पावले आहेत.
इटलीत व्यवहार बंदकोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इटली सरकारने कठोर पावले उचलल्यामुळे रविवारी देशातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येला घरातच थांबून राहावे लागले आहे. चीनच्या बाहेर कोविड-१९ चे सगळ्यात जास्त बळी इटलीतच झाले आहेत. व्हेनिस शहरात आणि आर्थिक राजधानी मिलानमध्ये मिळून १५ दशलक्ष (दीड कोटी) लोकांची घरे ही एकांतवासाची (क्वारंटाईन) बनली आहेत, तर संपूर्ण देशभर चित्रपटगृहे, संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत. अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात कोरोना व्हायरसने पहिला मृत्यू झाला आहे.
दक्षिण अफ्रिकेत तिघांना बाधाजोहान्सबर्ग : दक्षिण अफ्रिकेत कोरोना व्हायरसची तीन जणांना बाधा झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. देशात कोविड-१९ चा पहिला रुग्ण ठरलेल्याच्या पत्नीलाही त्याची बाधा झाली आहे. हे तिघेही इटलीहून परतले होते. ग्रँड प्रिन्सेस गोदीत लॉस एंजिलिस : कोरोना व्हायरसची बाधा झालेले अमेरिकन जहाज ग्रँड प्रिन्सेस या जहाजाला शनिवारी उशिरा गोदीत आणण्याची परवानगी दिली गेली. या जहाजावरील १९ कर्मचारी आणि दोन प्रवाशांना या विषाणूची बाधा झाली आहे. जहाजावरील ४५ जणांची यासाठी तपासणी झाली होती.
संपूर्ण अमेरिकेत या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या ४०० वर गेल्यामुळे न्यूयॉर्कने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. हा विषाणू आधीच अमेरिकेच्या ३० राज्यांत पसरला असून, १९ जणांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सीमध्ये शनिवारी एक रुग्ण आढळला.दक्षिण कोरियात नवे २७२ रुग्णसोल : दक्षिण कोरियात रविवारी शेकडो चर्चेस बंद करण्यात आली. या देशात कोविड-१९ चे सर्वात जास्त रुग्ण ७,३१३ झाले आहेत. रविवारी २७२ नवे रुग्ण समोर आले. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे देशात एकूण मृत्यू ५० झाले आहेत, असे सरकारने सांगितले.चीनमध्ये आतापर्यंत ५७ हजार रुग्णांना डिस्चार्जगेल्या जानेवारी महिन्यात चीनच्या हुबेई प्रांतात कोविड-१९ चा उद्रेक झाल्यापासून लागण झालेल्यांची संख्या प्रथमच ५० च्या खाली आली आहे, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. ४४ नवे रुग्ण शनिवारी समोर आले. त्यात हुबेई प्रांतातील वुहान येथील ४१ आहेत.चीनमध्ये या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या शनिवारी ८०,६९५ वर गेली. २०,५०० रुग्णांवर उपचार सुरू असून, ५७ हजार ६५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
विदेशींच्या प्रवेशावर अरुणाचलमध्ये बंदीकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर अरुणाचल प्रदेशने बंदी आणली आहे. विदेशींसाठी जारी करण्यात येणारे प्रोटेक्टेड एरिया परमिट (पीएपी) अस्थायी स्वरुपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अरुणाचलची सीमा चीनला लागून आहे. यापूर्वी सिक्किमनेही विदेशींवर अशी बंदी आणली आहे. भूताननेही दोन आठवड्यांसाठी विदेशी पर्यटकांसाठी आपली सीमा बंद केली आहे.
एम्समध्ये स्वतंत्र वॉर्डकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, जयप्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा सेंटरच्या नव्या आपत्कालीन शाखेच्या एका भागात संशयित कोरोना रुग्णांसाठी एक वेगळा वॉर्ड तयार ठेवावा. या वॉर्डमध्ये कोणत्याही वेळी २० रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्याला उपचारासाठी एनसीआय झज्जरमध्ये स्थलांतरीत करण्यात येईल.झज्जरमधील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेला मंत्रालयाने सांगितले आहे की, येथील वॉर्डमधील सध्याची २५ बेडची व्यवस्था वाढवून १२५ करावी. भारतात जे ३९ रुग्ण आहेत त्यातील १६ इटलीचे आहेत.