बीजिंग – एकीकडे जगातील अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे कोरोना व्हायरसबाबत नवनवीन खुलासे होत आहेत, कोरोनामुळे २०२० हे संपूर्ण वर्ष लोकांसाठी भयानक गेले आहे, या काळात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींनी आपल्या जवळची माणसं गमावली, या संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी जगातील संशोधक दिवसरात्रं कोरोना लसीचा शोध घेण्यात व्यस्त होते, त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि जगात आतापर्यंत ४-५ कोरोना लसींचा शोध लागला आहे.
या कोरोना लसीमुळे महामारीचा प्रार्दुभाव खरंच थांबेल का? हे येणारा काळ ठरवेल, परंतु अद्यापही कोरोनाची दहशत संपलेली नाही असं वारंवार सांगण्यात येत आहेत, त्यातच आतापर्यंत कोरोना व्हायरस मानवांमध्ये पसरत होता आता खाण्याच्या वस्तूमध्ये कोविड १९ ची पुष्टी झाली आहे. चीनमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी आईसस्क्रीम कोरोना संक्रमित झाल्याचं आढळलं आहे.
या बातमीमुळे चीनमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. चीनी अधिकारी या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर तपासामध्ये गुंतले आहेत, स्थानिक दुकानांमध्ये बनवण्यात येणारी आईसस्क्रीमचे तीन नमुने कोरोना व्हायरस संक्रमित असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. चीनमध्ये उत्तर पूर्व परिसरातील टियानजिन नगरपालिका हद्दीत ही घटना घडली आहे अशी बातमी अमर उजालाने दिली आहे.
टियानजिन डकियाडो फूड कंपनीकडून ४ हजार ८३६ आईसस्क्रीमचे डबे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत. ज्यातील २ हजार ८९ डबे स्टोरेजमध्येच सील करण्यात आले तर चीनच्या माध्यमानुसार संक्रमित डब्यांपैकी १ हजार ८१२ डबे दुसऱ्या राज्यात पाठवण्यात आले आहेत, ९३५ डबे स्थानिक बाजारात आले आहेत, त्यातील ६५ डब्ब्यांची विक्रीही झाली आहे. त्यामुळे चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
कंपनीत काम करणाऱ्या १ हजार ६६२ कर्मचाऱ्यांनी स्वत:ला आयसोलेट करून चाचणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. यूनिवर्सिटी ऑफ लीड्सचे वायरोलॉजिस्ट डॉक्टर स्टीफन ग्रिफिनच्या म्हणण्यानुसार आईसस्क्रीमच्या डब्ब्यात कोरोनाचं संक्रमण मानवामुळे झालं आहे. उत्पादन होणाऱ्या ठिकाणी व्हायरस पसरला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आईसस्क्रीम फॅटमध्ये बनवली जाते आणि त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येते, त्यामुळे व्हायरस तिथे आढळू शकत नाही. आईसस्क्रीमचा डबा अचानक कोरोना व्हायरस संक्रमित कसा झाला यावरून घाबरण्याचं कारण नाही असंही त्यांनी सांगितले आहे.