कोरोना व्हायरसच्या साथीचा अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणेवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. ब्रिटनमध्ये यामुळे डेंटल इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रॉयटर्सने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या महामारीदरम्यान ब्रिटनमधील सुमारे 2000 डेंटिस्टने काम सोडलं आहे. त्यामुळे डेंटिस्टच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, ते स्वतःच स्वत:चे दात काढतात. कारण यामुळे किमान इतर दात वाचू शकतात. दातदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका महिलेने स्वतःहून आपले 13 दात खेचून काढले आहेत.
सरकारी रुग्णालयांमध्ये डेंटिस्टची मोठी कमतरता असल्याने रुग्ण उपचाराविना परत जात आहेत. लोक डेंटिस्टला भेटण्यासाठी नंबर लावतात आणि जेव्हा त्यांचा नंबर येतो तेव्हा त्यांना कळतं की भेट रद्द झाली आहे. सरकारी रुग्णालयात काम करणारे डेंटिस्ट सांगतात, "कोरोनामुळे पगार कमी झाला आहे म्हणून बहुतांश डॉक्टरांनी गेल्या वर्षीच नोकरी सोडली. नवीन डेंटिस्ट कमी ठेवण्यात आले आहेत. यामुळे अडचण निर्माण झाली आहे."
आरोग्य विभागाने आता 3 लाखांहून अधिक डेंटिस्टच्या नियुक्तीसाठी 400 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे, परंतु हे लगेच होणार नाही. 1 लाख लोकांवर उपचार करण्यासाठी यूकेच्या सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ 32 डेंटिस्ट आहेत. दातदुखीने त्रस्त असलेल्या 30 लाखांहून अधिक लोकांना 64 किलोमीटर फिरूनही उपचाराची सुविधा मिळत नाही.
दातदुखीसाठी खासगी रुग्णालयात गेल्यावर उपचारापूर्वी 19 हजार रुपये मागितले जात आहेत. केवळ पेनकिलर औषधे देऊनही त्यांच्याकडून 38 हजार रुपये वसूल करण्यात आल्याचे अनेकांनी उघडपणे सांगितलं. जून 2021 पर्यंतची आकडेवारी दर्शवत आहे की गरजेच्या तुलनेत केवळ 33% लोकांनी डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेतले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.