पुणे : आईकडून बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना ससून सर्वोपचार रुग्णालयात घडली. 'व्हर्टिकल ट्रान्समिशन'ची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे. बाळामध्ये जन्मतःच ताप आणि कोरोनाची इतर लक्षणे आढळून आली. लहान मुलांसाठी असलेल्या कोविड विभागात बाळावर तीन आठवडे उपचार करण्यात आले. बाळ पूर्णपणे बरे झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज देण्यात आला.
वरील घटनेमध्ये गर्भवती स्त्रीला प्रसूतीच्या आदल्या दिवशी ताप आला होता. आईची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली, मात्र अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली. प्रसूती झाल्यावर बाळाच्या नाकातील नमुना, प्लासेंटा नाळेतील परीक्षणानुसार बाळ कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. बाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती. बाळावर तीन आठवडे उपचार करण्यात आले.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, 'आईकडून बाळाला कोरोनाची लागण होण्याची अर्थात 'व्हर्टिकल ट्रान्समिशन'ची भारतातील पहिलीच घटना ससून रुग्णालयात घडली. कोरोना काळात ससूनमधील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्ग पहिल्यापासूनच निकराने लढा देत आहे. या केसमध्येही सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचेच फळ म्हणून आई आणि बाळाला सुखरूप घरी पाठवण्यात यश मिळाले आहे.'
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, 'कोरोनाबाधित आई आणि बाळाची केस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होती. बाळाला कोरोनाची गंभीर स्वरूपाची लागण झाली होती. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न गरजेचे होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले असून, आई आणि बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ही केस नोंदवली जाणार आहे.'
-----
काय आहे 'व्हर्टिकल ट्रान्समिशन'?
आईच्या शरीरातील विषाणूने नाळेतून बाळाच्या शरीरात शिरकाव केला. कोरोनाचे अशा पद्धतीने लागण होण्याची ही अतिशय दुर्मिळ घटना असून याला 'व्हर्टिकल ट्रान्समिशन' असे म्हटले जाते. एचआयव्ही अथवा झिका व्हायरसच्या बाबतीत अशी लागण होऊ शकते.