कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत देशात २४०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 75 हजारांपेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.अमेरिकेत कोरोनाने अक्षरक्षः थैमान घातले आहे. नवीन रुग्णांची आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ९ हजारांच्या पुढे पोहोचला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशात एकाच दिवशी सर्वाधिक ६०० बाधितांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहा दिवसांपूर्वी ४७४ जणांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण बाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७७३ एवढी झाली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांहून जास्त असल्याची नोंद अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील विज्ञान व अभियांत्रिकी केंद्रानं केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगात २ लाख ५७ हजारपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी असल्याचे जाहीर केले होते.
अमेरिकेतील कोरोनाचे संकट येत्या जून महिन्यात आणखी गंभीर संकट धारण करू शकते. ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार जूनमध्ये अमेरिकेत दररोज २ लाख नव्या रुग्णांची नोंद होऊन सुमारे ३ हजार जण मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या सात आठवड्यांपासून सर्व राज्यांचा कारभार ठप्प आहे. त्याचा दुष्परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
अमेरिकेत आता कोरोना विषाणूची एकूण संख्या 12 लाख 50 हजारांवर गेली आहे. विशेष म्हणजे जगभरात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 4 दशलक्ष इतकी आहे.