शांघाय : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. उद्योगधंदे, विमान वाहतूक, माल वाहतूक, पर्यटन अशा क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. यामुळे मोठमोठ्या उद्योगांचे आणि जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. असे असताना कोरोनानेचीनसाठी मोठ्या समस्येसोबत लढण्यासाठी मदत केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे मलेशियाहून केरळमध्ये आलेल्या एका तरुणाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. तो कोरोनाग्रस्त असल्याचा संशय आहे. तर जगभरात आज 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरीही जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. तर चीनसोडून 48 देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये लोकांना येजा करण्यास, हस्तांदोलन करण्यावर बंदी होती. यामुळे वाहतूक ठप्पच झाली होती. याचा फाय़दा नेहमी प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या चीनला झाला आहे. चीनमधील प्रदुषणाची पातळी कमालीची खालावली असून याचे फोटो नासाने जारी केले आहेत.
वुहान-शांघायसारख्या औद्योगिक शहरात मोटार वाहने आणि आर्थिक मंदीमुळे नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत घट झाल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. याचे नासाच्या संशोधकांनाही आश्चर्य वाटले आहे. एका विशिष्ट कारणास्तव एखाद्या क्षेत्राच्या हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचे मी प्रथमच पाहिले आहे, असे नासाचे संशोधक फी ली यांनी सांगितले. 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात नायट्रोजन डाय ऑक्साईडची पातळी खाली आली होती. परंतु त्या वेळी प्रदूषणाच्या पातळीत घट ही आजच्या तुलनेत खूपच कमी होती, असेही त्यांनी नमूद केले आहे.