फ्रँकफूर्ट : कोरोना विषाणूच्या साथीमुळे येऊ घातलेल्या मंदीचा दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी युरोपीय देशांकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. कर सवलती आणि कंपन्यांना वित्तीय पाठबळ देण्यासारख्या उपायांवर विचार केला जात आहे. याशिवाय युरोपीय केंद्रीय बँकेकडूनही काही विशेष उपाय योजले जाणार आहेत.
सूत्रांनी सांगितले की, युरोपीय सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपन्यांना मौद्रिक प्रोत्साहन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. व्याजदरात कपात आणि कॉर्पोरेट बाँड्सची खरेदी, असे निर्णय जाहीर केले जाऊ शकतात. आरोग्यसेवा, व्यवसाय आणि श्रमबाजार यांना पाठबळ देण्यासाठी २८ अब्ज डॉलरचा गुंतवणूक निधी उभारण्याची योजना ‘युरोपीय आयोगा’ने मंगळवारीच जाहीर केली आहे. ‘युरोपी आयोगा’च्या अध्यक्ष उर्सुला व्होन डेर लियेन यांनी सांगितले की, हा निधी युरोपीय संघाच्या सध्याच्या अर्थसंकल्पामधून घेतला जाईल. हा निधी युरोपीय संघाच्या वार्षिक २०.७ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या अवघा ०.१ टक्का आहे. अशा उपाययोजनांनी कोरोनामुळे होणारे नुकसान मर्यादित राहील. मौद्रिक प्रोत्साहन योजना आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे वस्तूंची मागणी वाढेल. दरम्यान, १९ देशांच्या युरोपीय संघाकडे मोठे केंद्रीय कोषागार नाही. ही युरोपीय संघाची मोठी समस्या आहे. मात करणे शक्य नाहीजाणकारांच्या मते, या उपायांचा परिणाम मर्यादितच राहील. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे उद्योग बंद पडले आहेत. इटलीने नागरिकांच्या प्रवासावर, तसेच सार्वजनिक जमावावर संपूर्ण बंदी घातली. व्याजदर कमी केल्याने यावर काहीच परिणाम होणार नाही. बेरेनबर्ग खासगी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ होल्गर श्मिडिंग यांनी सांगितले की, सध्या जग ‘आरोग्य आणीबाणी’चा सामना करीत आहे. या समस्येवर मौद्रिक आणि वित्तीय उपायांनी मात करता येणार नाही.वाहनांच्या उत्पादनावर परिणामकोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधील उद्योग व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने भारतातील वाहन उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उद्योगासाठी लागणारा १० टक्के कच्चा माल चीनमधून आयात होत असल्यामुळे ही भीती सियामने व्यक्त केली आहे. चिनी नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वाहन कंपन्यांनी कच्च्या मालाचा नियमित साठा करून ठेवला होता. तथापि, चीनमधील ताज्या ‘लॉकडाउन’मुळे बीएस६ वाहनांसाठी आवश्यक असलेले सुटे भाग उपलब्ध होण्यात अडथळे येऊ शकतात, असे सियामचे अध्यक्ष रंजन वधेरा म्हणाले.सुट्या भागांच्या उपलब्धतेअभावी सर्व श्रेणींमधील वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होईल. प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, तीनचाकी वाहने, दुचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.