बीजिंग - चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र चीन सरकारच्या गोपनीयतेच्या धोरणांमुळे त्या देशात नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती जगाला मिळत नव्हती. दरम्यान, चीनने देशातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचे सत्य जगासमोर आणले आहे. ८ डिसेंबर ते १२ जानेवारी यादरम्यान, ३६ दिवसांमध्ये चीनमध्ये कोरोनामुळे तब्बल ६० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
झीरो कोविड पॉलिसीमध्ये काहीशी शिथिलता आणल्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नॅशनल हेल्थ कमिशनच्या अफेअर्स डिपार्टमेंटचे डायरेक्टर जियाओ याहुई यांनी सांगितले की, चीनमध्ये कोविडच्या संसर्गामुळए रेस्पिरेटरी फेल्युअरमुळे ५ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ५४ हजार ४३५ लोकांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला आहे. मात्र हे रुग्ण हे कॅन्सर किंवा हृदयाच्या आजारामुळे पीडित होते.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार चीन कोरोनामुळे झालेल्या त्याच मृत्यूंची मोजणी करत आहे जे निमोनिया आणि रेस्पिरेटरी फेल्युअरमुळे झाले आहेत. हा फॉर्म्युला डब्ल्यूएचओच्या पद्धतीपेक्षा एकदम वेगळा आहे. मृत्यू झालेल्यांचं सरासरी वय ८०.३ आणि मरणाऱ्यांचे ९० टक्क्यांचे वय ६५ किंवा त्यापेक्षा अधिक होतं.
चीनवर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंना लपवण्याचा आरोप होत आहे. चीनमधील रुग्णालये आणि स्मशानगृहे मृतदेहांमुळे भरली आहेत. अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.