वॉशिंग्टन : चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला असा कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. वन्यप्राण्यांद्वारेच हा विषाणू माणसांमध्ये संक्रमित झाला असण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. चीनमधून कोरोना विषाणूचा उगम झाला होता का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने चार शास्त्रज्ञ त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामध्ये डॉ. पीटर दसाक, प्रा. डेव्हिड हेमॅन, प्र. मरिऑन कूपमॅन्स, प्रा. जॉन वॅटसन यांचा समावेश होता.
या चार शास्त्रज्ञांनी एका कार्यक्रमात सांगितले की, चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या विक्रीचा मोठा व्यापार चालतो. अशा प्राण्यांमधून ही साथ पसरली असावी. वुहान शहरातील प्राण्यांच्या बाजारात वावरणारे काही लोक प्रथम आजारी पडले व त्यानंतर वुहाननजीकच्या प्रांतातले लोक आजारी पडले. या ठिकाणीच वटवाघळांमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले होते. चीनने कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत निर्माण केला आहे तसेच तो मुद्दामहून हवेत मिसळण्यात आला, असा आरोप अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.