जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता काही देशामध्ये ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान दक्षिण कोरियामध्ये कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
दक्षिण कोरियामध्ये लाखो महाविद्दयालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यातील 35 विद्यार्थी हे कोरोना संक्रमित असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या शिक्षण मंत्रालायाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1380 परीक्षा केंद्रावर जवळपास 4,93,430 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यामध्ये 35 कोरोना संक्रमित आणि आयसोलेशन मध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
नोव्हेंबरमध्ये ही वार्षिक परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ती उशिरा आयोजित करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे 540 नवीन रुग्ण आढळले. देशातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतातही अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या. 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या. पण कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं चांगलंच महागात पडलं. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली होती. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.