वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिअंटसंदर्भात इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. मात्र, यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत रुग्णालयांनी विशेष तयारी करणे गरजेचे आहे. चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉनची लागण झालेल्या एका व्यक्तीचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे आणि मृत्यूची ही जगातील पहिलीच घटना आहे.
रुग्णालयाती रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता -डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटले आहे, की जागतिक स्तरावर व्हेरिअंट ऑफ कंसर्नशी संबंधित रुग्णसंखेत वाढ झाल्याने, हॉस्पिटलायझेशन आणि मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे. याच वेळी, या नव्या व्हेरिअंटने संक्रमित झालेल्या लोकांच्या स्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणखी माहितीची आवश्यकता आहे. यामुळे देशांनी रुग्णालयात दाखल रुग्णांशी संबंधित माहिती शेअर करावी, असेही WHO ने म्हटले आहे. सध्या हा नवा व्हेरिअंट 60 हून अधिक देशांत पसरला आहे.
ओमायक्रॉनवर इंग्लंडनं दिला इशारा - ओमायक्रॉनसंदर्भात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, 'ओमाक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद गोष्ट म्हणजे. यामुळे हा व्हायरसचा किरकोळ प्रकार आहे, ही कल्पना आपण बाजूला ठेवायला हवी. लोकांमध्ये पसरण्याचा वेग आपण लक्षात घ्यायला हवा.
आरोग्य सचिव साजिद जाविद यांनीही या व्हेरिअंटसंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'लंडनमध्ये 44% लोकांना या व्हेरिअंटची लागण झाली आहे आणि 48 तासांत तो राजधानीत पूर्णपणे पसरेल'. एवढेच नाही, तर रोज ओमायक्रॉनचे सुमारे 200,000 नवे रुग्ण समोर येऊ शकतात, असा अंदाजही जाविद यांनी व्यक्त केला आहे.