जगभरात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका यूकेला बसला आहे. यामागचे एक मुख्य कारण, येथे अनेक लोकांनी अद्यापही लस घेतलेली नाही, असेही सांगितले जात आहे. रॉयल लंडन रुग्णालयाच्या आयसीयूमधील डॉक्टर प्रोफेसर रुपर्ट पिअर्स यांनी म्हटले आहे, की काही रुग्ण असेही आहेत, जे रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांकडे ताबडतोब लस टोचण्याची विनंती करत आहेत. ते म्हणाले, रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना अद्यापही लस मिळालेली नाही आणि त्यांचे वय 20 ते 30 वर्षे आहे.
लंडनमध्ये लसीकरणाचा दर सर्वात कमी आहे, संपूर्ण यूकेमध्ये 82 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. या तुलनेत लंडनमध्ये केवळ 61 टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बीबीसी रेडिओ कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर पिअर्स म्हणाले, 'आमच्याकडे आयसीयूमध्ये असलेल्या सर्व रुग्णांपैकी 80 ते 90 टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. मात्र, कोरोनाचे असेही काही रुग्ण येत आहेत, ज्यांना लस मिळाली आहे. आमच्याकडे आता जेवढे रुग्ण येत आहेत, त्यांनील बहुतेक रुग्ण, आता आम्हाला लस घेता येईल का? असे विचारत आहेत.
लंडनमध्ये, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमताही दुप्पट करण्यात येत आहे. गरज भासल्यास कार पार्किंगमध्येही फील्ड हॉस्पिटल तयार करण्याची योजना आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये सध्या केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत. यामुळे त्यांना सामान्य वॉर्डमध्येच ठेवले जात आहे. भारतालाही 'या' गोष्टीवर द्यावं लागेल लक्ष -भारतातही ओमायक्रॉन बाधितांची सख्या सातत्याने वाढत आहेत, यामुळे ब्रिटनमधील परिस्थिती लक्षात घेत, भारतातही नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस शक्य तेवढ्या लवकर देणे आवशक आहे. यामुळे भलेही संसर्गाचा धोका पूर्णपणे संपणार नाही. पण तो लसीकरण झालेल्या लोकांनी गंभीर आजारी करत नाही.