कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. पहिला रुग्ण सापडून वर्ष लोटले आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा जन्म झाला होता. या व्हायरसमुळे लाखो लोक मृत्यूमुखी पडलेले असताना चीनने याचे खापर भारताच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या एका वैज्ञानिकाने भारतातूनच कोरोना महामारी जगभरात पसरल्याचा आरोप केला आहे.
चीनची अकादमी ऑफ साय़न्सेजच्या वैज्ञानिकांनी हा जावईशोध लावला आहे. त्यांनी सांगितले की भारतात 2019 च्या उन्हाळ्यात हा व्हायरस जन्माला आला होता. हा व्हायरस जणावरांद्वारे दुषित पाण्यातून माणसामध्ये आला. यानंतर हा व्हायरस तेथून वुहानला आला. जिथे पहिल्यांचा कोरोना व्हायरसचा रुग्ण सापडला. चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये याबाबतचा अहवाल छापून आला आहे. ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झालेय त्यांचा शोध घेऊन व्हायरसचा स्रोत समजू शकतो, असे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
चिनी संशोधकांनी या पद्धतीचा वापर करून दावा केला की, वुहानमध्ये जो व्हायरस सापडला तो खरा व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया किंवा सर्बियामध्ये जन्माला आल्याचे संकेत मिळाले आहेत. भारत आणि बांगलादेशमध्ये कमी म्युटेशन झालेले व्हायरस सापडले आहेत. जे चीनचे शेजारी देश आहेत. यामुळे कोरोना व्हायरस भारतात जन्माला आल्याची शक्यता अधिक आहे. म्युटेशनला लागलेला वेळ आणि या देशांतून घेण्यात आलेले कोरोना व्हायरसचे नमुने पाहून वैज्ञानिकांनी दावा केला की हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा पसरला आहे.
चीनच्या दाव्याची हवाच काढलीब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाचे एक संशोधक डेव्हीड रॉबर्टसन यांनी डेली मेलला सांगितले की, चीनचे संशोधन खूपच सदोष आहे. हे संशोधन कोरोना व्हायरस बाबत आमच्या ज्ञानात जराही भर घालत नाही. चीनने याआधीही कोणताही पुरावा न देता अमेरिका आण इटलीवर कोरोना व्हायरस पसरविल्याचा आरोप केला आहे. डब्ल्यूएचओला मिळालेल्या पुराव्यांनुसार कोरोना व्हायरस चीनमध्येच तयार झाला आहे. डब्ल्यूएचओने तपासणी पथकही चीनला पाठविले आहे.