चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. येथील 'हवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सान्या शहरात शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे येथे सुमारे 80 हजारहून अधिक पर्यटक अडकून पडले आहेत. याशिवाय येथील अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात खबरदारीच्या सूचनाही दिल्या आहेत. एवढेच नाही, तर सान्या शहरात शनिवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुकी बरोबरच, लोकांच्या ट्रॅव्हलिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. सान्या शहराची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक आहे. चीनच्या दक्षिण किनार्यावरील हेनान प्रांताची राजधानी असलेले सान्या हे एक पर्यटन स्थळ आहे.
गेल्या १ ऑगस्टपासून शनिवारी सकाळपर्यंत सान्या शहरात एकूण ४५५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू झाल्यानंतर अचानकपणे कोरोना स्फोटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हैनान प्रांताचे आरोग्य अधिकारी ली वेंग्झिऊ यांनी ग्लोबल टाईम्ससोबत बोलताना सांगितले, की येथे BA5.1.3 हा प्रकार आहे. हा प्रथमच स्थानिक पातळीवर दिसून आला आहे. त्याचा संसर्ग दरही खूप अधिक आहे.
विमानांच्या तिकिटांची किंमत वाढली - शनिवारी सकाळी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भातील निर्बंध लादले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमाने सान्या शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांना परिस्थिती समजून घेऊन, ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
येथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, सान्याचे उपमहापौर हे शिगैंग म्हणाले की, सध्या सान्यामध्ये 80,000 हून अधिक पर्यटक आहेत. सान्या सोडण्यापूर्वी लोकांनी 48 तासांच्या आत त्यांच्या दोन पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याची खात्री करावी. दरम्यान, येथील विमान तिकिटाचे दरही अचानकपणे वाढायला सुरुवात झाली आहे.