लंडन : लस न घेतलेल्या लोकांइतकाच लस घेतलेल्या लोकांकडूनही कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे असे यासंदर्भात ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आले आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे.लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या लसी डेल्टा विषाणूवर कमी परिणामकारक आहेत असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा संसर्ग घरातील व्यक्तींपासून सर्वांत जास्त प्रमाणात होतो असे दिसून आले आहे. मात्र, लस घेतलेल्या लोकांकडून किती प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होतो यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे.
आरोग्य यंत्रणेवर ताण- डेल्टा विषाणूमुळे अमेरिकेमध्ये कोरोना साथीची स्थिती आणखी गंभीर बनली. जगात अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात लसीकरण होऊनही तिथे कोरोना रुग्णांची संख्या व त्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. - डेल्टा विषाणूने माजविलेल्या हाहाकारामुळे तेथील आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण पडला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली. - डेल्टा विषाणूला प्रतिबंध कसा करावा याकडे आता जगभरातील संशोधकाचे लक्ष लागले आहे.