वॉशिंग्टन : कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली होती का, याचा अमेरिका शोध घेत असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत केली का याबद्दल राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी झालेले माझे बोलणे आता उघड करणार नाही. अमेरिकेने कर्मचाऱ्यांसाठी चीनकडून काही लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट मागविली आहेत. चीनने अमेरिकेला हजारो व्हेंटिलेटरही पाठविले होते. त्यामुळे ट्रम्प आपले हितसंबंध सांभाळूनच चीनवर टीका करीत असल्याची चर्चा मीडियात आहे.
संसर्गाबद्दल दावे-प्रतिदावेया विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत केली की तो विषाणू प्राण्याकडून माणसामध्ये संक्रमित झाला याबद्दल शास्त्रज्ञांमध्येही मतैक्य नाही. याचे संक्रमण नैसर्गिक पद्धतीनेच झाले असावे असे अमेरिकेतीलच यंत्रणांचे मत आहे. तर याची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेतच केली मात्र त्यामागे जैविक युद्धाचा हेतू नव्हता, असे अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत जीवजंतूंवर प्रयोग केले जातात तिथे सुरक्षा सामग्रीची कमी आहे. त्यामुळेच या प्रयोगशाळेतील विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ शकला, असेही वृत्तांमध्ये म्हटले होते. (वृत्तसंस्था)