नवी दिल्ली : इराणमधील २०० भारतीय नागरिकांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विमानतळावर हे विमान पोहोचण्याची शक्यता आहे. १५ मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येईल. इराणहून तिसºया टप्प्यात १६ वा १७ मार्च रोजी विमान दाखल होईल.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत गुरुवारी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग हा चिंतेचा विषय आहे. इराण, इटलीसह जगभरातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. भारताने विदेशींच्या प्रवेशावर पूर्ण प्रतिबंध आणला नसल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये ६००० भारतीय फसले आहेत. यातील ११०० महाराष्ट्रातील प्रवासी आहेत आणि ते इराणच्या कोममध्ये अडकले आहेत, तर जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या ५२९ नमुन्यांपैकी २२९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जयशंकर यांनी सांगितले की, इराणमध्ये १००० भारतीय मच्छीमार अडकले आहेत. यातील कोणत्याही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल. जगातील ९० देशांत कोरोना पसरला आहे. काही प्रकरणांत सरकारने ई-व्हिसा आणि व्हिसा आॅन अरायव्हल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास करणाºया भारतीय नागरिकांना १५ दिवसांपर्यंत वेगळे ठेवण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीला स्वदेशात परतण्यासाठी संक्रमणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असणार आहे. ते म्हणाले की, जे विद्यार्थी इराणमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी श्रीनगरमध्ये भेटलो आहे. आपण त्यांना आश्वासन दिले आहे की, त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी सुविधा देईल.