ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर जगातील सर्व देशांनी दक्षिण आफ्रिकेवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात अनेक युरोपीय देशांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांसोबतची उड्डाणे स्थगित केली आहेत. यात, दक्षिण आफ्रिकेची प्रतिक्रियाही आली आहे. यावर बोलताना देशाचे आरोग्य मंत्री जो फाहला म्हणाले, दक्षिण आफ्रिकेसोबत ज्या पद्धतीने व्यवहार केला जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. आम्हाला अॅडव्हॉन्स जिनोम सीक्वेंसिंगच्या माध्यमाने नवा व्हेरिएंट शोधण्याची शिक्षा दिली जात आहे. (Omicron coronavirus variant)
नवा व्हेरिएंट शोधून आम्ही जगाला सावध केले -दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हणण्यात आले आहे, की आम्ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट शोधून जगाला सावध करण्याचे काम केले. हा प्रकार डेल्टापेक्षाही धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. आमच्या चांगल्या वैज्ञानिक तंत्रांचे कौतुक व्हायला हवे. पण जग आमच्यासोबत सावत्र आईसारखे वागते आहे. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी आम्हीही इतर देशांप्रमाणेच प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे जागतिक दर्जाची संसाधनेही आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला बसेल फटका -कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जवळपास सर्वच देशांनी आपापल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या होत्या. आयात-निर्यातीवरही अनेक निर्बंध लादले गेले. याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. उत्पादन आणि कच्च्या मालाची तीव्र टंचाई आहे. यातून अनेक देश अद्यापही बाहेर आलेले नाहीत. यातच आता दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा निर्बंधांचा धोका दिसू लागला आहे.
वेगानं पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट -ओमिक्रॉनची माहिती सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतून आली. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे. हा व्हेरिएंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशिवाय इस्रायल, बोत्सवाना, हाँगकाँग, बेल्जियम आणि इतर देशांमध्येही पोहोचला आहे.