ओमायक्रॉन डेल्टा एवढा जिवघेणा नाही, असे म्हटले जात आहे. परंतू ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या बळींची संख्या वाढत असताना आता अमेरिकेतही ओमायक्रॉन बाधिताचा मृत्यू झाला आहे. हा अमेरिकेतील नव्या व्हेरिअंटने घेतलेला पहिला बळी आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेची आरोग्य यंत्रणा सीडीसीने याची माहिती दिली आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 73 टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हॅरिस काऊंटी पब्लिक हेल्थद्वारे जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात या रुग्णाची माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या टेक्सास राज्यात 50 वर्षे वयाच्या रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झाली होती. त्याने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला याआधीही कोरोनाची बाधा झाली होती. लस न घेतल्याने आणि आरोग्य ठीक नसल्याने त्या व्यक्तीला कोरोनाची गंभीर लागण होण्याचा धोका होता. काऊंटीचे न्यायाधीश लीना हिडाल्गो यांनी सोमवारी या मृत्यूची माहिती दिली. त्याला अन्य आजारही होते.
भारतात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पारमंगळवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने संक्रमित झालेला एकूण आकडा जारी केला आहे. भारतात ओमायक्रॉनचे 200 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी 54 रुग्ण सापडले आहेत. यानंतर तेलंगाना 20, कर्नाटक 19, राजस्थान 18, केरळ 15, गुजरात 14 आणि अन्य राज्यांमध्ये असे 200 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 77 जण बरे झाले आहेत.