जगभरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच, भारताचा शेजारी असलेल्या चीनमध्ये मात्र, कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. चीनमधील या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. चीनने शांघाय शहरात कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी सोमवारपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यादरम्यान 2.6 कोटी एवढी लोकसंख्या असलेल्या शांघाय शहरातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाईल. (Corona Virus in China)
2 टप्प्यांत लागू होईल लॉकडाऊन -माध्यमंतील वृत्तांनुसार, हा शहरव्यापी लॉकडाऊन दोन टप्प्यात लागू केले जाईल. वुहान शहरानंतर शांघाय (Shanghai) शहरातील हा सर्वात मोठा लॉकडाऊन असेल. कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण वुहान शहरातच आढळून आला होता. यानंतर येथे 76 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
लोकल गव्हर्नमेंटच्या म्हणण्याप्रमाणे, शांघायचे आर्थिक केंद्र पुडोंग जिल्हा आणि त्याच्या आसपासचा प्रदेश सोमवार ते शुक्रवार बंद राहील. याच बरोबर, शहरात कोरोना बाधितांच्या तपासणीचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात, हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. याकाळात स्थानिक लोकांना घरातच थांबावे लागेल. कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील. याचबरोबर, सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. शांघाय शहरातील लोकवस्तीच्या भागांत अनेक गोष्टींवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. शांघाय डिझ्नी पार्कदेखील बंद करण्यात आला आहे.