वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे चीनचा आर्थिक विकास ठप्प होण्याची व अन्य पूर्व आशियाई देशातील सुमारे एक कोटी १० लाख लोक दारिद्र्याच्या खाईत ढकलले जाण्याची भीती जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.
या महाभयंकर रोगाच्या साथीमुळे पूर्व आशियाई देशांवर होणाऱ्या संभाव्य आर्थिक दुष्परिणामांचा अहवाल जागतिक बँकेने जारी केला. त्यात बँकेचे पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठीचे मुख्य अर्थतज्ज्ञ आदित्य मट्टू म्हणतात की, या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का बसला असून, त्यामुळे जगाच्या या भागामध्ये नजीकच्या काळात विकासाला खीळ बसून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नशिबी दारिद्र्य येईल.
अहवाल म्हणतो की, अगदी आशावादी अंदाज केला, तरी पूर्व आशियाई देशांचा आर्थिक विकास खूपच मंदावेल व चीनच्या बाबतीत तर विकासाचा दर गेल्या वर्षीच्या ६.१ टक्क्यांच्या तुलनेत अगदी २.३ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या साथीची सुरुवात जेथून झाली तो चीन मोठ्या मंदीच्या संकटातून वाचला, तरी त्याला विकासाची दौड कायम ठेवणे कठीण जाईल. चीनची अर्थव्यवस्था जगात दुसºया क्रमांकाची असल्याने तेथील दुरवस्थेचे परिणाम साहजिकच जागतिक व्यापारात इतरत्रही दिसणे क्रमप्राप्त आहे. (वृत्तसंस्था)
आर्थिक व्यवहार ठप्पपूर्व आशिया आणि पॅसिफिक या क्षेत्रात चीनसह एकूण १७ देशांचा समावेश होतो. जागतिक व्यापारात त्यांचा वाटा ७० टक्के आहे. यापैकी बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन तेथील आर्थिक व्यवहार गेला महिनाभर थबकले आहेत. याचा परिणाम म्हणून या देशांमध्ये एक कोटीहून अधिक नव्या लोकांना दारिद्र्याचा सामना करावा लागू शकेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.