नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूचे नवे रुग्ण वाढत असताना जगभर कोरोनाचे रुग्ण बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी १० लाखांच्या वर नोंदले गेले. फ्रान्समध्ये एका दिवशी १,७९,८०७ नवे रुग्ण नोंदले गेले व ही युरोपमधील सगळ्यात जास्त संख्या आहे.
फ्रान्ससोबत इटली, ग्रीस, पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्येही कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे. नाताळच्या सणामुळे नव्या रुग्णांची संख्या उशिराने नोंदली गेली असू शकते, असे बीबीसीने वृत्त दिले.
फ्रान्स, इटलीत विक्रमी वाढफ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिव्हिएर वेरॅन यांनी जानेवारी सुरू होताच २.५ लाख रुग्णांची नोंद होऊ शकेल, असा इशारा दिला. फ्रान्सच्या रुग्णालय महासंघाने खूप कठीण आठवडे तर अजून यायचे आहेत, असे म्हटले. अमेरिकेत रुग्णांसाठी विलगीकरण व क्वारंटाइन कालावधी कमी केल्याने तज्ज्ञांनी टीका केली आहे.
पुन्हा कठोर निर्बंधांचा इशारा खूप वेगाने पसरत असलेल्या ओमायक्रॉन विषाणूला रोखण्यासाठी या वर्षी मी नव्याने निर्बंध लादणार नाही, असे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनी म्हटले, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही रुग्णवाढ झाली. जॉन्सन मंत्रिमंडळातील सहकाऱी मंत्र्यांनी लोकांनी नवे वर्ष साजरे करताना खूप काळजी घ्यावी, असे आवाहन केले. आरोग्यसेवा हतबल झाल्याचे दिसल्यास निर्बंध खूप कठोरपणे लागू होतील, असा इशाराही या मंत्र्यांनी दिला.