कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
युरोपीयन देशांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. इटली, ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्ये कोरोनाचा धोका प्रचंड वाढला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता कोरोनामुळे इटलीमध्ये १०,००० लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे इटलीमध्ये पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. तसेच चीनमध्ये ३२९५, अमेरिकेत १७०४, स्पेनमध्ये ५१३८, इराणमध्ये २३७८, फ्रान्समध्ये १९९५ आणि जर्मनीमध्ये ३९१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत २० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेचे देखील कोरोनाने कंबरडे मोडले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो, गेल्या 24 तासांत तब्बल 18 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 345 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एका दिवसात ९७० जणांचा मृत्यू
इटलीत ८६,४९८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून १०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवारी कोरोनामुळे एकाच दिवसात ९७० जणांचा मृत्यू झाल्याने एक नवा विक्रम इटलीमध्ये नोंदविला गेला होता.