न्यूयॉर्क - कोरोनाविरोधाती लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. एका नव्या संशोधनामध्ये लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या शरीरामध्ये सुपर इम्युनिटी सापडली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील ओरेगन हेल्थ अँड सायन्स विद्यापीठामध्ये एक छोट्याशा समुहाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा निष्कर्ष पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. या रिपोर्टनुसार २६ जणांवर ही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये समजले की, लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामध्ये तब्बल २००० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. ज्या लोकांवर ही चाचणी करण्यात आली त्यांना लस घेण्यापूर्वी कधीही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नव्हता. तसेच लस घेतल्यानंतर त्यांना संसर्ग झाला होता. दरम्यान, चाचणीमध्ये या लोकांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण एक हजार ते दोन हजार टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसून आले.
शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी सापडल्याच्या प्रकाराबाबत प्रा. फिकाडू ताफेसे यांनी सांगितले की, संशोधनामध्ये आम्ही पाहिले की, या लोकांमध्ये अँटीबॉडींचा स्तर पुरेसा वाढलेला आहे. तर याची टक्केवारी एक हजार ते २ हजारदरम्यान दिसून आली. अँटीबॉडींचे हे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले.
प्राध्यापक फिकाडू ताफेसे यांनी अँटीबॉडीच्या या प्रमाणाचा उल्लेख हा सुपर इम्युनिटी असा केला आहे. प्राध्यापक फिकाडू ताफेसे यांनी डेली मेलशी बोलताना सांगितले की, ही सुमारे एक सुपर इम्युनिटी आहे. संपूर्ण जग ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने फैलावत असताना आणि अनेक लसी विषाणूविरोधात निरुपयोगी असल्याचे दिसत असताना अमेरिकेमधील हे संशोधन समोर आले आहे.