इस्लामाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातचा मरकज हा देशातील कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. येथील कार्यक्रमानंतर देशभरात विखुरलेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे, अनेक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त मुस्लीमांशी संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता, तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तानही कोरोनाच्या विखळ्यात आला आहे. पाकिस्तानमध्येही तबलिगी जमातच्या बेजबाबदार कृत्याची टीका होत आहे.
पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. पाकिस्तानमधील वर्तमानपत्र डॉनच्या एका वृत्तानुसार पंजाब स्पेशल ब्रँचने म्हटले आहे की, १० मार्च रोजी तबलिगी जमातच्या संमेलनात ७० ते ८० हजार लोकं एकत्र आले होते. दरम्यान, जमातच्या व्यवस्थापकाने म्हटले की, या कार्यक्रमाला २.५ लाखांपेक्षा जास्त लोक एकत्रित आले होते. त्यामध्ये ४० देशांमधून आलेले ३ हजार नागरिक होते. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत ४१९६ लोकांना कोरोनाचे संक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कोरोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रावळपिंडी येथे जवळपास २ लाख नागरिक लॉकडाऊन असून ते घरातच आहेत. तर, तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १०,२६३ नागरिकांना पंजाबच्या ३६ जिल्ह्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. अद्यापही हजारो नागरिकांचा तपास सुरु आहे.
महाराष्ट्रात, दिल्ली येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमला उपस्थित राहून देखील माहिती लपवल्याच्या आरोपाखाली 150 व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम 188, 269 व 270 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५३९ तबलिग जमातच्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये रावळपिंडी मरकज येथील ४०४ तबलिगींचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर, ६ दिवसांचा हा कार्यक्रम ३ दिवसात संविण्यात आला होता. त्यानंतर, अनेक नागरिक आपल्या घरी गेले, पण विदेशातून आलेले मुस्लीम येथे अडकून पडले आहेत.
दरम्यान दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. त्यांना क्राईम ब्रांचच्या पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. मात्र, या नोटीसला उत्तर देताना मौलाना साद यांनी आपली एक ऑडिओ क्लिप जारी केली. यात त्यांनी, आपण क्वारंटाईनमध्ये आहोत. सध्या मरकज सील आहे, जेव्हा मरकज उघडले जाईल तेव्हाच या प्रश्नांची उत्तरे देता येतील, असे म्हटले होते. याशिवाय मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते.