न्यूयॉर्क - कोरोनामुळे अमेरिका, इटली, स्पेनसह इतर युरोपियन देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांमधील कोरोनाबधितांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 37 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाख 84 हजारांपर्यंत पोहोचली आहे.
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूने गंभीर रूप धारण केले आहे. अमेरिकेत काल एका दिवसात 20 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत 3148 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 63 हजारांहून अधिक झाली आहे. तर इटलीमध्ये कोरोनामुळे अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत मृतांचा आकडा 11 हजार 591 हुन अधिक झाला आहे. इटलीत गेल्या 24 तासांत 812 जणांचा मृत्य झाला आहे.
अमेरिका आणि इटलीबरोबरच स्पेन, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेल्जियम या देशांमध्येही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजार 800 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जर्मनीत 645, फ्रान्समध्ये 3024, इंग्लंडमध्ये 1408, इराणमध्ये 2700 हुन अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोना साथीने घातलेले थैमान लक्षात घेता, तेथे जाहीर करण्यात आलेली लॉकडाऊनची मुदत आणखी महिनाभराने वाढविण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. या देशात केलेल्या लॉकडाऊनची मुदत सोमवारी संपणार होती; पण आता तिचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचीही चिन्हे आहेत.
अमेरिकी सरकारचे संसर्गजन्य आजारांसंदर्भातील सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले, की कोरोनाचा अमेरिकेत लक्षावधी लोकांना संसर्ग होऊन १ लाखाहून अधिक जणांचा बळी जाऊ शकतो. हा इशारा अत्यंत गांभीर्याने घेऊन ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील लॉकडाऊनची मुदत वाढविली.