बीजिंग : कोरोनामुळे चीनमधील मृत्यूचे वास्तव दाखविणारी उपग्रह प्रतिमा समोर आली आहे. ही प्रतिमा अमेरिकन मॅक्सर टेक्नॉलॉजी कंपनीने प्रसिद्ध केली असून, त्यात तांगशान शहरातील स्मशानभूमीबाहेर लागलेली वाहनांची रांग दिसते. चीनच्या स्मशानभूमींत मृतदेहांचा ढीग साचला असून, आता हॉटेललाच स्मशान बनविण्याची चीनची योजना आहे. चीनचा शेजारी जपानही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत असून, तेथे २४ तासांत जवळपास दोन लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत.
चीनमधील कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे. येथे स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग पडले आहेत. जागा संपत चालली आहे. हे पाहता आता हॉटेल्सचे स्मशानभूमीत रूपांतर केले जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती त्याच्या बांधकाम कंपनीला २०० मृतदेह जाळण्याची क्षमता असलेल्या हॉटेलचे स्मशानभूमीत रूपांतर करण्याचा आदेश मिळाल्याचे सांगत आहे. झेंग यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ बीजिंगचा आहे.
चीनमध्ये जाऊ नका
जर्मनी, बेल्जियम आणि लक्झेंबर्ग यांनी नागरिकांना गरज नसेल तर काही काळ चीनला जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनमध्ये कोरोनाचे शिखर गाठले गेले आहे, असे म्हटले आहे.
भारताला नो टेन्शन
देशात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १९७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.
फायझरची नकारघंटा
चीनला कोरोनाच्या औषधासाठी परवाना देण्यास नकार दिला आहे. चीनला कोरोनाचे औषध पॅक्सोविड बनविण्याचा परवाना देणार नाहीत. कोरोना औषधाच्या किमतीबाबत चीनसोबत करार होऊ शकला नाही. चीनला एल साल्वाडोरसारख्या देशाकडून कमी खर्चात औषध मिळवायचे आहे. - अल्बर्ट बुर्ला, मुख्य कार्यकारी, फायझर