फ्लोरिडा - प्रेमात एकमेकांसॊबत जगण्यामरण्याच्या आणाभाका अनेकजण घेतात, पण ते फार थोड्यांच्याबाबतीत वास्तवात उतरते. मात्र थोडाथोडका नव्हे तर तर 51 वर्षे संसार केल्यानंतर आजी-आजोबांच्या एका जोडप्याने एकाच दिवशी अगदी काही मिनिटांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना अमेरिकेतील असून, येथील फ्लोरिडा शहरात राहणाऱ्या स्टुअर्ट बेकर आणि एड्रियान बेकार या दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. या दाम्पत्याच्या विवाहाला 51 वर्षे पूर्ण झाली होती. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढत असताना स्टुअर्ट यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची पत्नी एड्रियान यांनाही कोरोनाचे संक्रमण झाले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांची तपासणी करून स्टुअर्ट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पाठोपाठ एड्रियान यांनाही रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी एकाच दिवशी अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. या दाम्पत्याचा मुलगा बडी बेकर याने याबाबत माहिती दिली. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, आतापर्यंत सुमारे 3 लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 6 हजारहून अधिकजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.