नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. हळूहळू या व्हायरसची व्याप्ती वाढली असून अमेरिकेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गेल्या काही आठवड्यापासून चेहऱ्याला हात लावला नसल्याचे वक्तव्य केले होते. या मृत्यूंमुळे अमेरिकेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
चीनमध्ये सुरवातीला या व्हायरसने रौद्ररुप धारण केले होते. या व्हायरसने एकट्या चीनमध्येच 3000 च्या आसपास बळी घेतले असून जगभरातही हा आकडा वाढत आहे. जवळपास 50 हून अधिक देश कोरोनाच्या प्रभावाखाली आले आहेत. भारतातही 30 रुग्ण आढळले असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय नौदलासह, हवाई दलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिकेमध्ये गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे 11 जण दगावले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी घरातच राहण्याची वेळ आली तर तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये 152 जणांना लागण झाली आहे.
अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यापासून पॅकबंद खान्या पिण्याच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. लोक डबाबंद दूध, फळे, स्नॅक्स आदी वस्तू मोठ्या प्रमाणावर नेत आहेत. याशिवाय हँडवॉश, सॅनिटायझर यांची विक्रीही वाढली आहे. फ्लोरिडा, मियामी, न्यूयॉर्क सारख्या शहरांवर हा धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात तब्बल 1400 पटींनी सॅनिटायझरची मागमी वाढली होती.