लंडन - मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतरही ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काडळे आहे. येथे कोरोनाविरोधातील लस घेतलेल्या प्रौढांमध्येही कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत. (Coronavirus In Britain) ब्रिटनमधील किंग्स कॉलेज लंडनचे वरिष्ठ व्हायरस ट्रॅकिंग स्पेशालिस्ट प्रा. टीम स्पेक्टर यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. येथे एकूण ८७ टक्के बाधित लोक ते आहेत ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे. अशा परिस्थितीत आता १९ जुलैपासून ब्रिटनमध्ये पूर्णपणे अनलॉक करणे योग्य ठरणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. (In Britain, 50 percent of people who have been vaccinated have become infected with coronavirus)
ब्रिटनमध्ये ६ जुलै रोजी कोरोनाच्या १२ हजार ९०५ अशा रुग्णांचे निदान झाले होते ज्यांनी कोरोनावरील लस घेतलेली होती. त्यामुळे ६ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापलडलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे लसीकरण झालेल्या लोकांमधून सापडले. प्राध्यापक स्पेक्टर यांच्या अंदाजानुसार येत्या काळात हा आलेख अधिकच वर जाण्याची शक्यता आहे.
मात्र असे असले तरी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या संबंधीचे सर्व निर्बंध १९ जुलै रोजी संपुष्टात येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जॉन्सन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, निर्बंध हटवल्यानंतर ब्रिटनमध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आता आवश्यक नसेल.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जनतेला खबरदारी घेण्याची आणि वैयक्तिक जबाबदारीसह काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाची साथ संपुष्टात आली नसल्याचेही जॉन्सन यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण सोमवार म्हणजेच १९ जुलैपासून त्वरित सामान्य जीवनात परतू शकत नाही. लोक गर्दी असलेल्या इनडोअर ठिकाणी फेसकव्हरचा वापर करतील, अशी अपेक्षाही जॉन्सन यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एनएचके वर्ल्डच्या रिपोर्टनुसार सरकारच्या या निर्णयाबाबत काही तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. जर विषाणूचा फैलाव होत असेल तर निर्बंध हटवणे हे धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, डेल्टा विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यापासून ब्रिटनमध्ये दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.