कोरोना प्रादुर्भावानं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) साप्ताहिक अहवालानुसार गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या ९ आठवड्यांपासून नव्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसून आलं होतं. पण गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात एकूण ३० लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी कोरोना परिस्थिती संदर्भातील साप्ताहिक अहवाल जारी केला. यात ५ जुलै ते ११ जुलै या कालावधीत जगभरात ३० लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही ११ टक्के रुग्णवाढ ठरली आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या आठवड्यात ५५ हजाराहून अधिक जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. मृत्यूंच्या संख्येत ३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
ब्राझील आणि भारतात सर्वाधिक रुग्ण५ जुलै ते ११ जुलै दरम्यानच्या काळात जगभरात सर्वाधिक रुग्ण ब्राझील आणि भारतात आढळून आले आहेत. यात ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात ३.३३ लाखांहून अधिक, तर भारतात २.९१ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतासाठी दिलासादायक बाब अशी की नव्या रुग्णवाढीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ७ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे.
ब्राझील आणि भारतानंतर इंडिनेशिया रुग्ण संख्येत तिसऱ्या स्थानावर आहे. इंडोनेशियात २.४३ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे इंडोनेशियाचा हा आकडा गेल्या आठवड्यापेक्षा तब्बल ४४ टक्क्यांनी अधिक नोंदवला गेला आहे. २.१० लाखांच्या रुग्णवाढीसह यूके चौथ्या स्थानी, तर १.७४ लाख रुग्णवाढीसह कोलंबिया पाचव्या स्थानावर आहे.
१११ देशांमध्ये पोहोचला डेल्टा व्हेरिअंटकोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिअंट संपूर्ण जगभरात वेगानं पसरत असल्याचीही नोंद डब्ल्यूएचओनं केली आहे. आतापर्यंत जगभरातील एकूण १११ देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंट पोहोचला असल्याची माहिती डब्ल्यूएचओनं दिली आहे. डेल्टा व्हेरिअंटचा पहिला रुग्ण भारतात आढळला होता.
ज्या देशांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे आणि लोकांची गर्दी वाढली आहे अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्याची दाट शक्यता आहे, असा स्पष्ट इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रम, सभा किंवा सण आयोजित केल्यानं मोठ्या संकटाला निमंत्रण देणारं ठरू शकतं असंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.