बिजिंग - कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या उत्तर भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. येथे लाखो लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरे तर, चीनमध्ये कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सध्याची आकडेवारी ही गेल्या 21 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. चीन सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शून्य कोविड धोरणावर काम करत आहे. या अंतर्गत, इतर देशांना लागून असलेल्या सीमावरती भागात निर्बंध, क्वारंटाइनच्या काळात वाढ आदी उपायांचा समावेश आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic) होणार आहे, त्यामुळे चीनला कोरोना महामारीशी संबंधित परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी येथे कोविड-19 चे 209 प्रकरणे नोंदवली गेली. मार्च 2020 नंतर एका दिवसात समोर आलेली ही सर्वाधिक प्रकरणे आहेत.
नागरिकांवर उपासमारीची वेळ -चीनमधील सियान शहरात काही आठवड्यांपूर्वीच कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. येथे वाहन चालविण्यासही बंदी आहे. याशिवाय येथे घरातील कुण्याही एका सदस्यालाच तीन दिवसांतून एकदाच किराणा सामान आणण्याची परवानगी आहे. शहरातील अनेक जण सोशल मीडियावर अन्न आणि जीवनावश्यक वस्तूं मिळाव्यात यासाठी आवाहन करत आहेत. यांपैकी एकाने वेबसाइटवर लिहिले की, मी उपाशीच मरणार आहे. येथे खाण्यासाठी काहीच नाही आणि घराबाहेर पडू दिले जात नाही. कृपया मदत करा.
चीनच्या स्टेट ब्रॉडकॉस्टर CCTV नुसार, या शहरात 4400 सॅम्पलिंग साइट्स आणि सुमारे 1 लाख लोक चाचणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. स्टेट ब्रॉडकॉस्टरने जारी केलेल्या फुटेजमध्ये अनेक भागांत मास्क घातलेले लोक चाचणीसाठी लांबच लांब रांगेत उभे असलेले बघायला मिळत आहेत.