बीजिंग - चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा कहर आता चीनमध्ये जवळपास थांबला आहे. वुहानमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. चीनकडूनही दावा करण्यात येतोय की, आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यातच शनिवारी चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चीन तीन मिनिटांसाठी थांबले होते.
राष्ट्रपती शी झिंपींग यांच्या नेतृत्वात शनिवारी कोरानामुळे मरण पावलेल्या लोकांना आणि शहिद आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन मिनिटांचे मौन पाळण्यात आले होते. त्यावेळी चीन एकप्रकारे थांबले होते. चीनने कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देताना शहिद झालेले व्हिसलब्लोअर डॉक्टर ली यांच्यासह मरण पावलेल्या ३३०० लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.
कोरोना व्हायरसमुळे शहिद झालेल्या आणि मरण पावलेल्या लोकांच्या स्मरणात आय़ोजित केलेल्या शोकसभेत शी झिंपींग यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. सर्वांनी आपल्या शर्टवर पांढरे फूल लावले होते. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजासमोर मृतांना आदरांजली वाहण्यात आली. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये सायरन आणि कारचे हॉर्न वाजताच रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी रस्त्यावरील लोकांना आपले आश्रू अनावर झाले होते. या कालावधीत देशभऱात आणि चीनच्या परदेशातील दुतावासांवरील राष्ट्रीय ध्वज अर्धा खाली घेण्यात आलेला होता.