जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरातून सुरू होऊन जगभरात पोहचला. त्यानंतर अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. एकीकडे जग कोरोना महामारीनं हैराण झालं होतं तर दुसरीकडे चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. यात सर्वात महत्त्वाची भूमिका लसीकरणाची ठरली.
चीनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावं यासाठी सरकारने आकर्षिक ऑफर लोकांना दिल्या. त्यामुळे जे लोक लसीकरणापासून पळ काढत होते त्या लोकांनीही लसी घेण्यासाठी रांगा लावल्या. जे लोक लस घेतील अशांना मोफत अंडी, स्टोअर कुपन आणि किराणा सामानाच्या दरात सूट अशा ऑफर देण्यात आल्या. या ऑफरचा फायदा असा झाला की, मोठ्या प्रमाणात लोकांनी लसीकरण अभियानात सहभागी झाले आणि लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्या.
चीनमध्ये लसीकरणाची सुरूवात धीम्यागतीनं झाली होती. आता प्रत्येक दिवशी लाखो लोक कोरोनाची लस घेत आहेत. २६ मार्चला ६० लाख लोकांनी लस घेतली. एका वरिष्ठ शासकीय डॉक्टरांच्या मते, जूनपर्यंत देशात १ अब्ज लोकांपैकी ५० कोटी ६० लाख लोकांना लस दिली जाईल. चीनमध्ये २०१९ मध्ये पहिल्यांदा कोरोना संक्रमित रुग्णाची ओळख पटली होती. वुहानमध्ये हॉस्पिटलमध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण होणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यावेळी या व्हायरसला ओळखलं. सरकारने जानेवारी २०२० पासून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी २ महिन्याहून अधिक काळ शहर आणि हुबई प्रांतात लॉकडाऊन लावला होता.
चीनने सीमाबंदी आणि तातडीनं लॉकडाऊन लावल्याने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जेव्हा कोरोना संक्रमण कमी होत होते तेव्हा लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली जात होती. परंतु पुन्हा संक्रमण वाढल्यास लॉकडाऊन सक्तीचं केले होते. कोरोना संक्रमण कमी झाल्यामुळे अनेक लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे या लोकांना आकर्षिक करण्यासाठी चीन सरकारने भन्नाट ऑफर्स शोधून काढल्या. त्यामुळे लसीकरण केंद्राकडे पुन्हा लोकांच्या रांगा लागल्या.