वॉशिंग्टनः कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव झाला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना अपयश आलेलं आहे. कोरोना विषाणूसंदर्भात चीननं महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचाही अमेरिकेकडून आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स आणि इराणसारख्या देशांनीही चीनवर कारवाईची मागणी केली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापारयुद्ध भडकल्याचं चित्र समोर आलं होतं. कोरोनाच्या काळात अमेरिकेनं पुन्हा एकदा चीनला इशारा दिला आहे. जर चीन तरतुदींचे पालन करणार नसेल तर त्यांच्याबरोबर असलेला व्यापार करार संपुष्टात आणला जाईल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.ट्रम्प म्हणाले की, आमच्यापेक्षा कोणीही चीनबाबत एवढी कठोर भूमिका घेऊ शकत नाही. चीनमधलं वुहान हे कोरोना विषाणूचं केंद्रबिंदू असल्यानं चीन आणि अमेरिकेत वारंवार शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच चीननं हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच तर सोडला नाही ना, अशी शंकाही अमेरिकेनं उपस्थित केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या व्हायरसला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस असंही संबोधतात.
- अमेरिकेला बसला कोरोनाचा सर्वाधिक फटका
चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण 82,788 लोकांना झाली असून, तिथे 4,632 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर अमेरिकेत 8,24,600 लोक संक्रमित झाले आहेत आणि त्यातील 45,290पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच त्याचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेलाच बसला आहे.
- चीन-अमेरिकेमध्ये काय करार होता
चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर यंदा जानेवारीत स्वाक्षरी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापार युद्धाची कटुता विसरून दोन्ही देशांनी या करारास सहमती दर्शविली होती. दोन वर्षांपासून दोन्ही देशांमधील व्यापार युद्धामुळे जगातील शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, या करारामध्ये असे म्हटले गेले होते की, चीन 200 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन उत्पादनांची खरेदी करेल. यासाठी चीननं पुढाकाराही घेतला होता. परंतु अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाने अहवालात म्हटले आहे की, 'एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या कराराचं नूतनीकरण होण्यासाठी चीन त्यात एक नवीन अट घालू शकेल'.
- ...तर व्यापार करार रद्दच करू
यावर पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “जर असे झाले तर आम्ही हा करार रद्द करू आणि जे आमच्यासाठी अधिक चांगले होईल.” “चीनबाबत माझ्यापेक्षा कुणी इतकं कठोर असू शकत नसल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.