बीजिंग - कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याचा शोध घेण्याची मागणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यादरम्यान चिनी संशोधकांनी वटवाघळांमध्ये एका नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शोध लावल्याचा दावा केला आहे. (Coronavirus News)सीएनएनने आपल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या कोरोना विषाणूची प्रजाती ही जेनेटिक दृष्ट्या कोविड-१९ (Covid-19) विषाणूच्या खूप जवळ जाणारी असू शकते. संशोधकांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम चीनमध्ये कोरोना विषाणूच्या घेण्यात आलेल्या नव्या शोधामुळे वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे कोरोना विषाणू असू शकतात. ते माणसांनाही बाधित करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ( Chinese researchers find 24 types of corona virus, some similar to covid-19)
Cell जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये शान्डोंग विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांमधून आम्ही २४ प्रकारचे कोरोना विषाणू एकत्रित केले आहेत. यामधील चार विषाणू SARS-CoV-2 सारखे आहेत. हे नमुने मे २०१९ पासून नोव्हेंबर२०२० पर्यंत जंगलात राहणाऱ्या वटवाघळांमधून एकत्रित करण्यात आले होते. वटवाघळांच्या मलमुत्राचे आणि आणि तोंडातील स्वँबचे नमुने घेण्यात आले. चिनी संशोधकांच्या म्हणण्यानुसार एक विषाणू जेनेटिक दृष्ट्या SARS-CoV-2सोबत बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. SARS-CoV-2 हा तोच कोरोना विषाणू आहे ज्याने गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी सांगितले की, स्पाईक प्रोटिन वगळता हा विषाणू कोविड-१९शी बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. याचा स्ट्रक्चर सुद्धा तसाच आहे. जो पेशींना चिकटण्यासाठी विषाणूमध्ये दिसून येतो.
या संशोधन पत्रात चिनी संशोधक लिहितात की, जून 2020मध्ये थायलंडमध्ये मिळालेल्या सार्स-कोव-२ विषाणूचे परीक्षण केल्यावर असे दिसून येते की, वटवाघळांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव खूप अधिक आहे. काही भागात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची आवृत्ती खूप अधिक असू शकते. संपूर्ण जगातून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात नव्याने तपास करण्याची मागणी होत असतानाच कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबाबतची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेसह जी-७ देशांनी याबाबत तपास करण्याची मागणी लावून धरली आहे. चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दीड वर्ष उलटूनही कोरोना विषाणू नेमका कुठून आला याचा शोध लावता आलेला नाही. वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू लिक झाल्याच्या दाव्यांवर पुढील तपास करण्यात यावा, अशी मागणीही संशोधकांकडून करण्यात येत आहे.