जर्मनीसध्या जगभर एक चर्चा आहे की, कोरोना काळात भूकबळी जाता कामा नये. आपल्या देशातही लोक अन्नछत्र उघडत आहेत. भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचवत आहेत. काहीजण आपण किती उदार-दानशूर म्हणून केलेल्या अन्नदानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. मात्र, या साऱ्यात समाधान इतकंच की, कुणी उपाशी राहू नये, याची कळकळ जगभर माणसांमध्ये दिसते.या साऱ्यात एक चर्चा अशीही आहे की, हा कोरोना माणसांना दारिद्र्यरेषेखाली ढकलून जाईल. मध्यम-कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं संकोच करतात कुणाकडून काही घेण्यात; मात्र ही आपत्ती अशी आहे की, त्यापैकी अनेकजण हा संकोच सोडून अन्नासाठी रांगेत उभे राहतील. मागास आणि विकसनशील देशांतच नाही तर स्वत:ला श्रीमंत, विकसित म्हणविणाºया देशांतही हे चित्र आता आम होऊ लागलं आहे.काही दिवसांपूर्वीच जर्मनीतला एक फोटो कुणी ट्विट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. रस्त्याच्या कडेला, कपांऊंडवर अन्नाच्या पिशव्या टांगलेल्या आहेत. कुणी जमेल तसं तिथं ठेवून जातं, कुणी हवं ते घेऊन जातं. ना कुणाला दिल्याचा अहंगंड, ना कुणाला घेण्याचा संकोच. त्याचं कौतुकही झालं. विशेषत: आशियाई देशांत राहणाऱ्या माणसांनी या देण्या-घेण्याच्या कृतीचं खूप कौतुक केलं. कारण ‘दाता’ आपल्याकडे देण्यापेक्षा मोठा होता हा अनुभव आहे. असं असलं तरी जर्मनीतही ‘हिडन हंगर’ अशी चर्चा आहेच. म्हणजे वरकरणी भूक दिसत नाही; मात्र एक वर्ग असा, ज्याला दोनवेळच्या जेवणाची चिंता आहेच.ती आजच नाही तर कोरोनापूर्वीच्या काळातही होती; मात्र आता कोरोनाकाळात तिनं पुन्हा उघड डोकं वर काढलं आहे. जर्मनीत फूड बँक आहेत. त्याला जर्मन भाषेत ‘ताफेल’ म्हणतात. साºया जर्मनीत मिळून सुमारे ९३० फूड बँक आहेत. लोक आपलं राहिलेलं अन्न तिथं देतात, फूड बँकसाठी पैसे देतात आणि ज्यांना गरज आहे ते त्या बँकेतून अन्न घेऊन जातात. साधारण कोरोनापूर्व काळात १५ लाख लोकांनाया फूड बँकेचा आधार होता. आता नवीन आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र, ती संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.रस्त्याकडेला टांगलेल्या अन्न पिशव्यांची संख्याही बोलकी आहे. त्यात माणसांसाठीचेच अन्न पदार्थ, नाही तर डॉगफुड, औषधं, काही फळं असंही अनेकजण ठेवून जात आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ४६ वर्षांची लीलीफर कुस सांगते, मी दर गुरुवारी ताफेलला जाऊन अन्न आणते. मी पाच दिवस कसाईखान्यात नोकरी करते; पण माझं भागत नाही. मग मी गुपचूप जाते. माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना हे माहिती नाही. कळलं तर ते त्याची गावभर चर्चा करतील अशी भीती वाटते. ओशाळवाणं वाटतं. पण भागत नाही तर काय करू, मी अन्न चोरत नाही, मागत नाही. तिथं उपलब्ध आहे ते घेऊन येते, यात वाईट ते काय?’ लीलीफरसारखे नोकरदार आता वाढले असतील अशी शंका आहे. जे गुपचूप आपल्या गरजा भागवत आहेत, कारण संकोच. लीलीफर एकल माता आहे, घटस्फोटानंतर चार मुलांना ती एकटीनं सांभाळते आहे. जर्मनीतलं हे चित्र आहे. सारं जग या दिशेनं जाईल असं भय आहे. झाकपाक तरी किती काळ करणार, कोरोनानं सारंच आणि साऱ्यांनाच उघडं पाडलं आहे.
CoronaVirus: गरजूंचा स्वाभिमान जपणाऱ्या फूड बँकची बातच न्यारी; मदतीचा 'जर्मन पॅटर्न' जगात भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 3:29 AM