- अभय नरहर जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘कोविड १९’ म्हणजेच कोरोनाच्या साथीने जगभरात विशेषत: युरोपसह अमेरिकेत थैमान घातले आहे. मात्र, युरोपातील काही देशांना कोरोनाच्या संसर्गाची झळ बसूनही त्यांनी तातडीने पावले उचलत यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे या देशात ही साथ पसरूनही त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणावर त्यांनी युरोपातील देशांच्या तुलनेने नियंत्रण मिळवले आहे. यात जर्मनी हे मोठे उदाहरण आहे. आजअखेर जर्मनीत एकूण ९६,१०८ विषाणू बाधित पेशंट असून, त्यापैकी एक हजार ४४६ मृत्युसंख्या आहे. यापैकी २६ हजार ४०० जण बरे झाले आहेत. याविषयी मूळच्या पुणेकर आणि जर्मनीत स्टुटगार्ट येथे स्थायिक झालेल्या अनघा महाजन यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.
महाजन यांनी सांगितले, की मागील वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये कोरोना व्हायरसची कुणकुण लागताच जर्मनीतील शास्त्रज्ञ जोरात कामाला लागले होते. अतिशय जलदगतीने व्हायरससाठी लागणारी चाचणी त्यांनी विकसित केली. जानेवारीच्या मध्यापासून ही टेस्ट जवळजवळ देशातील सर्व राज्यांतील लॅबपर्यंत पोहोचवण्यात आली होती. देशातील पहिला पेशंट कोरोनाबाधित होण्याआधीच येथे टेस्ट उपलब्ध होती. इटली, स्पेन व फ्रान्स या देशांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. जर्मनीने कोरोनामुळे होणाºया मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय काम केले आहे. मास टेस्टिंग, सर्वाधिक आयसीयूमधील बेडची व्यवस्था आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ हेच नियंत्रणाचे रहस्य आहे. आज जर्मनीची आठवड्याला ५,००,००० (पाच लाख) टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच या टेस्ट ‘युनिवर्सल मेडिकल इन्शुरन्स सिस्टिम’ने कव्हर केलेल्या आहेत. जर्मनीतील ‘रॉबर्ट कोख’ या रोगनियंत्रण संस्थेने सुचविल्याप्रमाणे तीन आठवड्यांपासून शाळा, रेस्टॉरंट बंद करण्याचा आणि दोनपेक्षा जास्त लोकांना बाहेर एकत्र फिरण्यास मनाई करण्याच्या कठोर उपायांनी व्हायरसचे नवीन संक्रमणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते.
इतर देशांच्या रुग्णांवरही उपचारजर्मन रुग्णालयांनी इटली व फ्रान्समधील काही गंभीर ‘कोविड १९’ रुग्णांना दाखल करून घेतले आहे. यामुळे जर्मन डॉक्टर, नर्सना गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर कसे उपचार करावेत, हे शिकण्याची संधी मिळणार आहे. इतर सर्व देशांनी त्यांच्या सीमा बंद केलेल्या असताना अशा पद्धतीने जर्मनीने आपल्या रुग्णालय व्यवस्थापन क्षमतेवर उल्लेखनीय आत्मविश्वास दाखवून दुसºया देशातील गंभीर रुग्णांना उपचार सेवा देण्याचा निर्णय घेतला. - अनघा महाजन, स्टुटगार्ट, जर्मनी