रोम/ लंडन - कोरोना विषाणूने चीननंतर आता युरोप खंडाला विळखा घातला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका इटलीला बसला असून, आज दिवसभरात इटलीमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
Coronavirus : इटलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 627 जणांचा मृत्यू, तर यूकेमध्ये लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:24 AM