चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरस जागतिक महामारी बनला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना कमी होत असून जगातील अन्य देशात दिवसेंदिवस या व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. चीन, इटली, इराक, भारत, अमेरिकासह अनेक देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटलीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या आजाराला मात देण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. कोरोनावर उपचार म्हणून अमेरिकेत एका महिलेवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात आली आहे.
अमरेकेमध्ये राहणारी 43 वर्षीय जेनिफर हॅलर दोन मुलांची आई आहे. जेनिफर हॅलर जगातील पहिली महिला आहे, जिच्यावर कोरोना व्हायरसच्या लसीची चाचणी करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्सीन टेस्ट साठी तंदुरस्त व्यक्ती हवा असतो. रोगाचा त्या व्यक्तीवर प्रयोग करण्यात येतो. असं करीत असतांना त्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो. कोरोना सारख्या महामारीतून जगाची सुटका व्हावी म्हणून आपला जीव धोक्यात टाकून जेनिफर हॅलर पुढे आल्याने तिचे सर्वस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
अमेरिकेतील २ खासदारांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १५० जणांचा मृत्यू झाला आहे. दहा हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले असून, त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनने अनेक उपाय योजले आहेत. या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने अन्य देशांतील प्रवाशांना युरोपीय समुदायाने प्रवेशबंदी केली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवार (19 मार्च) दुपारी 2,20, 827 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,900 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 85,121 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.