इस्लामाबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असलेल्या भारताl बेसुमार रुग्णवाढीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) मोठ्या प्रमाणात झालेल्या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडत असून, उपचारांसाठी आवश्यक बाबींची टंचाई जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातील इतर देशांसोबत पाकिस्ताननेसुद्धाभारताला मदत करण्याची ऑफर दिली होती. मात्र आता पाकिस्तानमध्येच कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढू लागले असून, बुधवारी येथे एका दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. (coronavirus in Pakistan)
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने भारताला कोरोनाविरोधात लढण्यासाठी व्हेंटिलेटर एक्स-रे मशीन यांसह अनेक मेडिकल इक्विपमेंट्स देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता त्यांच्याच देशात रुग्णवाढ होऊ लागल्याने पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. दरम्यान, बुधवारी पाकिस्तानमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे २०१ मृत्यूंची नोंद झाली आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत पाकिस्तानमध्ये २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे आतापर्यंत १७ हजार ५३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीत ५ हजार २१४ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या २४ तासांत देशभरात पाच हजार २९२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख १० हजार २३१ वर पोहोचली आहे.
२३ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक १५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर गतवर्षी २० जून रोजी १५३ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले होते. मात्र आता एका दिवसांत होणाऱ्या मृत्यूंची संख्या २०१ वर पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ८८ हजार ०२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख ४ हजार ४९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.